स्मार्ट रिव्ह्य़ू : ऑलिम्पस-एसझेड-३० एमआर - (Olympus SZ-30MR)
इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये काल अशक्य वाटणारी गोष्ट ही आज शक्य असते आणि आजचे स्वप्न हे उद्या निश्चितच पूर्ण होणारे असते. असे असले तरी आजवर अनेकदा असे झाले आहे की, अनेक गोष्टी त्या त्या वेळची वस्तुस्थिती आणि विज्ञान पाहाता अशक्य वाटतात. पण भविष्यात मात्र त्या शक्य झालेल्या पाहायला मिळतात. अगदी फार दूर नाही तर अवघ्या चार- पाच वर्षांपूर्वी १० एक्स ऑप्टिकल झूम असलेला डिजिटल कॅमेरा म्हणजे त्या क्षेत्रातील परिसीमा गाठलेला कॅमेरा असेच सर्वांना वाटत होते.
जे ऑप्टिकल झूमच्या बाबतीत तेच त्याच्या मेगापिक्सेलच्या बाबतीतही त्यावेळेस तेवढेच लागू होते. त्यावेळेस ८ मेगापिक्सेल म्हणजे डोक्यावरून पाणी असेच वाटत होते. डिजिटल कॅमेऱ्याच्या बाबतीत आलेले दोन अनुभव हे या, असे वाटण्याच्या मुळाशी होते. डिजिटल कॅमेऱ्याच्या म्हणजे फिक्स्ड लेन्स डिजिटल कॅमेऱ्याच्या बाबतीत त्याचे मेगापिक्सेल वाढले की, त्याच्या चित्रणाच्या सुस्पष्टतेवर काहीसा परिणाम झालेला जाणवत होता. तसाच अनुभव डिजिटल झूम आणि ऑप्टिकल झूमच्याही बाबतीत येत होता. म्हणजे डिजिटल आणि ऑप्टिकल झूम वाढली की, पुन्हा एकदा कॅमेऱ्याच्या प्रतिमांकनाच्या सुस्पष्टतेवर त्याचा परिणाम दिसत होता. या अनुभवामुळे चार- पाच वर्षांपूर्वी फिक्स्ड लेन्स डिजिटल कॅमेऱ्याच्या बाबतीत मेगापिक्सेलची संख्या दुप्पट होणे किंवा झूमदेखील दुप्पट करून चांगली प्रतिमा मिळवणे तसे थोडे अशक्य कोटीतीलच वाटत होते.
शंकांना पूर्णविराम
त्यातही फिक्स्ड लेन्स कॅमेऱ्याचा आकार आटोपशीर म्हणजे पॉकेटसाईज ठेवताना एवढी झूम कशी काय देणार, असा पडलेला प्रश्न हा तसा साहजिकच होता. पण आता ऑलिम्पसने बाजारात आणलेल्या एसझेड ३० एमआर या डिजिटल कॅमेऱ्याने या दोन्ही प्रश्नांना चांगले उत्तर देऊन शंकांना पूर्णविराम देण्याचेच काम केले आहे.
२४ एक्सझूम व १६ मेगापिक्सेल
२४ एक्सझूम म्हणजे नेहमीच्या भाषेत बोलायचे तर २५-६०० ची लेन्स किंवा त्याच्या समकक्षेत येणारी लेन्स. या कॅमेऱ्यामध्ये बीएसआय सीएमओएस सेन्सर असून प्रतिमांकनासाठी दोन प्रोसेसिंग चिप्स वापरण्यात आल्या आहेत. किंबहुना त्यामुळेच तर हा कॅमेरा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. यातील २४ एक्स झूम त्यात अगदी नेटक्या पद्धतीने बसविण्यात आली असून तो चक्क १६ मेगापिक्सेलच्या प्रतिमा आपल्याला देतो. या प्रतिमा या रिव्ह्यूसाठी म्हणून वेगवेगळ्या तांत्रिक क्षमतांमध्ये शूट केल्या असता, त्यातून हाती आलेल्या प्रतिमा या बहुतांश चांगल्या दर्जाच्या होत्या.
देखणे बाह्यअंग
कॅमेऱ्याचे बाह्यअंग दिसायला देखणे आहे. ऑलिम्पसच्या इतर कॅमेऱ्यांप्रमाणेच त्याला उजव्या बाजूला पकडण्यासाठी चांगली ग्रिप आहे. मागच्या बाजूला अंगठा येतो, तिथे तो सटकू नये यासाठी एक छोटेखानी रबर ग्रिपही देण्यात आली आहे, रचनेच्या बाबतीत ती खूपच सोयीची आहे.
४ लाख ६० हजार डॉटस्
मागच्या बाजूस असलेला स्क्रीन आकाराने मोठा असून त्याच्यावर आपण शूट करत असलेले दृश्य थेट पाहण्याची सोय आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार आपल्याला सेटिंग्जमध्ये बदल करता येऊ शकतात. स्क्रीनचे वैशिष्टय़ म्हणजे ४ लाख ६० हजार डॉटस्मधून हा स्क्रीन तयार झाला आहे. त्यामुळे त्याची सुस्पष्टता चांगली आहे.
भटकंतीसाठी योग्य
या कॅमेऱ्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तो पर्यटनासाठी किंवा भटकंतीच्या खास उद्देशाने तयार केलेला कॅमेरा आहे. त्यामुळे त्यात मजेचा भाग खूप आहे. पर्यटनादरम्यान वापरकर्त्यांला त्याचा वापर करून अधिक चांगली मजा लुटता येईल, व्यतित केलेले क्षण अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील, अशी सेटिंग्ज त्यात देण्यात आली आहेत.
मल्टी रेकॉर्डिंग
या मॉडेलचे अनोखेपण हे एकाच वेळेस दोन प्रकारच्या शूटिंग्जची दिलेली सोय हे आहे. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही या कॅमेऱ्यावर व्हिडिओ शूट करू शकता आणि त्याचवेळेस तुम्हाला असे वाटले की, त्यावेळचा एखादा क्षण हा कॅमेऱ्यातही बंद करायचा आहे, तर ती अनोखी सोय या कॅमेऱ्यामध्ये देण्यात आली आहे. अन्यथा अनेक कॅमेऱ्यांमध्ये तुम्हाला व्हिडिओ मोड बंद करून कॅमेरा मोड सुरू करावा लागतो. अर्थात ते सोयीचे जावे यासाठी मागच्या बाजूस स्क्रीनच्या जवळ सर्वात वरती लाल रंगाचे एक बटण दिले आहे. ते दाबताक्षणी व्हिडिओ किंवा कॅमरा मोड सुरू होतो. फक्त एकच बाब वापरकर्त्यांना लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे एकदा एक मोड सिलेक्ट केल्यानंतर दुसरा मोड सिल्केट करताना एक्सपोजर किंवा फोकस आदी बाबी बदलता येत नाहीत. त्या त्याच मोडवर शूट कराव्या लागतात.
नेहमीप्रमाणे त्याच्या खालच्या बाजूस टिपलेल्या प्रतिमा पाहण्याची सोय असलेले बटण, मेनू, ‘इन्फो’ ही गोलाकार चकती आणि त्या खाली हेल्प हे बटण अशी सोय देण्यात आली आहे.
उपयुक्त मोडस्
वरच्या बाजूने कॅमेरा पाहिला असता डावीकडे फ्लॅशची वरची बाजू तर उजवीकडे वाईड ते झूम लेन्स अशी अर्धगोल चकती आणि त्याच्या आतमध्ये क्लिक् करण्याची गोल चकती अशी रचना दिसते. त्याच्या डाव्या बाजूस विविध सेटिंग्ज असलेली गोल चकती आहे. त्यावर ऑटो, प्रोग्रॅम, मल्टिरेकॉर्डिंग (म्हणजेच एकाच वेळेस व्हिडिओ क्लिप आणि फोटदेखील), मॅजिक, पॅनोरमा, थ्रीडी आणि सीन असे मोडस् देण्यात आले आहेत. यातील मल्टी रेकॉर्डिंग मोडमध्ये वेगवेगळ्या आकारात दोन फ्रेम्स शूट क रण्याची सोय व त्याचे सेटिंग देण्यात आले आहे. स्क्रीनवर पाहून त्यानुसार आपल्याला ती सोय करता येते.
मायक्रो व सुपरमायक्रो
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मोडवर मायक्रो आणि सुपर मायक्रोचीही सोय देण्यात आली आहे. व्हिडिओ मोडमध्ये अनेक डिजिटल कॅमेऱ्यांमध्ये मायक्रो मोडची सोय उपलब्ध नाही. हे इथे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरावे.
मॅजिक मोड
मॅजिक मोडमध्ये नव्या आलेल्या पेन मालिकेतील कॅमेऱ्यांप्रमाणेच विविध फिल्टर असलेली सेटिंग्ज व त्याचे मोडस् देण्यात आले आहेत. त्यात पिन होल कॅमेरा, फिश आय लेन्स, ड्रॉइंग, सॉफ्टफोकस, पंक, स्पार्कल, वॉटर कलर व पॉप आर्ट अशा सोयींचा समावेश आहे. जुन्या पिन होल कॅमेऱ्यातून एखादे दृश्य ज्याप्रमाणे दिसेल तसेच ते या मोडवर पाहाता व टिपताही येते. फिश आय लेन्सचा इफेक्टही चांगला मिळतो. मात्र तो विस्तीर्ण लँडस्केपसाठी चांगला ठरू शकतो. व अधिक परिणामकारक दिसतो. प्रत्यक्षात ते दृश्य रेखाटनामध्ये कसे दिसू शकेल ते ड्रॉइंग मोडवर पाहाता आणि टिपता येते. मात्र सर्वच दृश्ये या मोडवर चांगली येत नाहीत. या मोडला काहिशा मर्यादा असल्याचे प्रत्यक्ष रिव्ह्यूदरम्यान जाणवले. हा मोड भविष्यात अधिक चांगला करणे गरजेचे आहे. सॉफ्ट फोकस हा व्यक्तिचित्रणासाठीचा उत्तम मोड असून त्यावर खूप चांगले परिणाम रिव्ह्यू दरम्यान मिळाले. पंक, स्पार्कल आणि पॉप आर्टही व्यवस्थित काम करतात. पॉप आर्ट हा अलीक़डच्या तरुणाईला भावणारा, आवडणारा असा मोड आहे. यातील वॉटरकलर हा नवा मोड काही चित्रणांच्या बाबतीत म्हणजेच खासकरून लँडस्केप आदी चांगला दिसतो. प्रसंगी तो वस्तूचित्रणातही खूप चांगला काम करतो. या मोडचा वापर कुठे चांगला मिळतो कुठे नाही ते वापरकर्त्यांना अनुभवानेच ठरवावे लागेल.
पॅनोरमा
गेल्या अनेक वर्षांमध्ये या मोडदेखील खूपच लोकप्रिय झाला असून अनेक कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल कॅमेऱ्यामध्ये या मोडचा समावेश केला आहे. सोनीचा कॅमेरा तर यासाठीच प्रसिद्ध आहे. अनेकांनी केवळ त्यातील पॅनोरमा मोडच्या वापरासाठी तो विकत घेतला आहे. आता ऑलिम्पसनेही त्यांच्या या नव्या कॅमेऱ्यामध्ये ही पॅनोरमाची सोय उपलब्ध करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातही ऑटो आणि मॅन्यूअल अशा दोन सोयी आहेत. त्यात ऑटोमध्ये समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या बाणाच्या दिशेने आपण कॅमेरा केवळ एकाच लयीत फिरवायचा की, बाकी सारे काम कॅमेरा स्वतच करतो म्हणजे कॅमेराच प्रतिमांकन करून टिपलेले फोटो एकत्र केलेल्या अवस्थेत आपल्यासमोर पॅमोरमा सादर करतो. किंवा मग एखाद्या मॅन्यूअली हे करायचे असेल तर ते तसेही शक्य आहे. म्हणजे आधीचा फोटो जिथे संपतो तिथे नवा फोटो सुरू करून. अशा पद्धतीनेही पॅमोरमा तयार केला जाऊ शकतो.
फ्लॅशची सोय
समोरच्या बाजूस लेन्सच्या डावीकडे एक छोटीशी कळ लेन्सच्या वरच्या बाजूस देण्यात आली आहे. ती दाबल्यानंतर लगेचच फ्लॅश वरती येतो. ही एक चांगली उपयुक्त सोय आहे. कॅमेऱ्याचे बाह्यअंग तर उत्तम वाखाणण्याजोगे आहे. या संपूर्ण रिह्यूदरम्यान लक्षात आलेली बाब म्हणजे रात्रीच्या फोटोंमध्ये काही वेळेस नॉईज पातळी अधिक जाणवते. त्यामुळे प्रतिमा आवश्यक तेवढय़ा सुस्पष्ट येत नाहीत. मात्र काही सेटिंग्जच्याच बाबतीत फक्त हा अनुभव येतो.
शॉट टू शॉट
शॉट टू शॉट परफॉर्मन्समध्ये हा कॅमेरा चांगला आहे. त्याचा वेग १.८ सेकंदांचा आहे. मात्र झूमवर प्रतिमा टिपताना तो काही सेकंद फोकसिंगसाठी अधिक घेतो, असे लक्षात आले. कंटिन्यूअस मोडमध्ये ऑलिम्पसचा दावा आहे की, प्रतिसेकंद ७ फ्रेम्स टिपल्या जातात. पण प्रत्यक्षात मात्र प्रतिसेकंद सरासरी ५.८ च्या आसपास फ्रेम्स टिपल्या जातात, असे लक्षात आले. अर्थात हा सर्वोत्तम नसला तरी बऱ्यापैकी परफॉर्मन्स आहे.
उत्तम व्हिडिओ
एव्हीसी फॉर्मॅटमध्ये १०८०पी या दराने व्हिडिओ शूट करण्यात आले ते साधारण २८ मिनिटांपर्यंत केले जाऊ शकते. हे करताना झूम व ऑटो फोकस मोटर सुरू असते. मात्र त्याचा पारसा परिणाम या दरम्यान केलेल्या स्थिर चित्रणावर जाणवत नाही. बाहेर केलेले चित्रण तर उत्कृष्ट दर्जाचे आहेच. पण घरात केलेल्या चित्रणामध्येही सुस्पष्टता फारशी कमी झालेली दिसत नाही, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
भटकंतीच्या गरजा
आपण सहलीला किंवा भटकंतीला जातो, त्यावेळेस आपल्या दोन- तीन गरजा असतात. त्यातली महत्त्वाची म्हणजे भरपूर अंतरावर काही असेल तर ते टिपण्यासाठी चांगली झूम आणि जवळचे म्हणजेच क्लोज-अप टिपण्यासाठीची चांगली सोय. या दोन्ही बाबी तर हा कॅमेरा पूर्ण करतोच. पण त्याही शिवाय महत्त्वाचे म्हणजे हा कॅमेरा वापरत असताना तुम्हाला वेगळा व्हिडिओ कॅमेरा सोबत नेण्याची गरज नाही. कारण व्हिडिओ चित्रण आणि स्थिर चित्रण या दोन्ही बाबी तो तेवढय़ाच चांगल्या क्षमतेने करतो. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे मजाच करायची तर त्यासाठी वेगवेगळे फिल्टर असलेले मोडस् आहेतच की. एकूण काय तर सहलीला किंवा भटकंतीवर जाणाऱ्यांसाठी एक चांगला कॅमेरा ऑलिम्पसने आपल्या हाती दिला आहे !
courtesy: विनायक परब ,मंगळवार, २० डिसेंबर २०११ Lokasatta, Thane Vrutant.
Olympus SZ-30MR Camera Features:
- 16-megapixel CMOS Camera
- 24X Optical Zoom
- 25mm Wide
- 3.0 Inch LCD Screen
- Digital Image Stabilization
- HD Movie Recording
- Face Detection
- AF Tracking
- Shadow Adjustment
- Magic Filter
- Beauty Mode
- USB Battery Charge
- Multi Recording
- 3D Photo
Olympus SZ-30MR Price in India: MRP Rs. 23,999/- Indian Rupee (INR)